गळ्यामंदी विठ्ठलाच्या फुलांचा यो हार
नतमस्तक होतो देवा अभंगाचा सूर ll धृ ll
आवरेना मोह आता
धुंद झाले वारकरी
चिपळ्यांची किणकिण
पांडुरंग विटेवरी
पायापाशी गर्दी तुझ्या तुला नाही भार
नतमस्तक होतो देवा अभंगाचा सूर ll १ ll
दुमदुमे पंढरीत
टाळ मृदुंग आवाज
दरवळे चोहीकडे
सुगंध मंदिरी आज
भक्तासाठी उघड तू पंढरीचे दार
नतमस्तक होतो देवा अभंगाचा सूर ll २ ll
सावळा हा रंग तुझा
दिसे शोभिवंत टिळा
मग्न होऊनी तुझ्यात
मज लागलाय लळा
डोळे भरून पाहुदे तुज भक्तास फार
नतमस्तक होतो देवा अभंगाचा सूर ll ३ ll
कवी प्रशांत गायकवाड