बाप
रडतांना समजावी
मला माझे मायबाप
घाम गाळूनी लपवी
तो अंगावरील ताप
चिंब अंग पावसाने
कुडकुडला थंडीत
नवे वस्त्र माझ्यासाठी
खुश फाटक्या बंडीत
बाप बापच असतो
उभारतोय घराला
शोभते तोरण तेव्हा
त्याच्यामुळेच दाराला
उंच गगनी नव्याने
मन मुक्त झेप घ्यावी
जखम होई जीवाला
लगेचच लेप लावी
गाळलेले घाम बापा
थांबुदेना कुठे तरी
विसावण्याची गरज
आता तुला आहे खरी
चिरून तू काळजाला
काळजी घेतोस आहे
आनंदी आनंद नित्य
वाटूनी देतोस आहे
भुकेलेले पोट तुझे
ओठावर गोड हसू
हृदयातल्या वेदना
कधी देत नाही दिसू
सुखी ठेव त्या पित्याला
मारली ना मिठी घट्ट
नौकेत आयुष्याच्या या
पुरवितो सारे हट्ट
तिन्ही ऋतुत असते
कणखर हे छप्पर
फुलते फुल डोलते
मूळ भक्कम तोवर
त्याच्यासवे असल्याने
नसतो कोणता व्याप
नसते कसली चिंता
असतो जोवर बाप
कवी प्रशांत गायकवाड